
कुपवाड : प्रतिनिधी
कुपवाड , ता.१५ : औद्योगिक वसाहतीतील कारखान्यासमोर सोमवारी (ता.१४) रात्री साडे दहाच्या सुमारास मोक्यातील आरोपी व सराईत गुन्हेगार समीर रमजान नदाफ (वय ४१ रा. रॉयल सिटी अपार्टमेंट, कुपवाड) याचा धारधार शस्त्राने मानेवर हातावर व पोटावर वार करून खून केल्याची घटना घडली. सदर घटनेची कुपवाड पोलीसांत नोंद झाली असून शमा रियाज नदाफ (रा. रॉयल सिटी अपार्टमेंट, कुपवाड) यांनी कुपवाड पोलिसांत फिर्याद दिली. हा खून दारू पिण्याचे व पैसे मागण्याच्या जुन्या वादातून करण्यात आला. या खूनप्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघां संशयितांना अटक केले असून त्यांच्यावर कुपवाड पोलीसांत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोहेल सलीम काझी (वय 30 रा. खारे मळा चौक, कुपवाड) व सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादम (वय 26 रा.बडेपिर कॉलनी जुना मिरज रोड, कुपवाड) अशी अटक केलेल्या दोघां संशयितांची नावे आहेत. तर संशयित मधील सोहेल काझी हा सराईत गुन्हेगार आहे.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार सोमवार (ता.१४) रात्री साडेदहाच्या सुमारास दोघाही संशयितांनी समीर नदाफ याला कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील मेनन पिस्टन चौक ते सावळी दारू पिण्यास बोलावले असता दारू पिताना वाद झाल्याने त्यावादातून दोघांनी सराईत समीर नदाफवर धारधार शस्त्राने छातीवर, पोटावर आणि डोक्याच्या पाठीमागे वार केले. यावेळी समीर नदाफने तेथून पळ काढला व एका कारखान्याबाहेर तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. सदर घटनेची माहिती कुपवाड पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने गंभीर जखमी नदाफला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यांनी घोषित केले.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर, उपाधीक्षक प्राणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयितांना ताब्यात घेणेबाबत आदेशित केले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे पथक तयार करुन सदरचा खुनाच्या गुन्हयातील संशयितांना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.
त्या अनुषंगाने सपोनि / जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोहेकॉ/ सागर लवटे व पोहेकॉ/ संदीप गुरव यांना गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार खून नदाफच्या दोन मित्रांनी केला आहे. संशयित दोघे बडेपीर दर्गा, जुना मिरज रोड, कुपवाड येथे थांबले आहेत अशी माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली.
त्यांच्या माहितीनुसार, मृत नदाफ हा संशयित सोहेल काझी याच्या पानपट्टीवर येऊन मावा तसेच सिगारेट घेवून त्याचे पैसे न देताच निघून जात होता. पैसे मागितल्यास नंतर दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत असे. सोमवार ता.१४ रोजी सोहेल काझी व सोहेल मुकादम हे कुपवाड पाण्याचा टाकीजवळ थांबलेले होते. समीर नदाफ त्या ठिकाणी आला. तो दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. त्यावेळी त्यास दारू पिण्यास जावूया असे सांगून संशयितांनी नदाफला सावळी येथील मेनन पिस्टन चौक रोड आरटीओ ऑफिसचे बाजूचे खुल्या मैदानावरती नेले. तिथे दारू पित असतानाच नदाफ यावर संशयितांनी धारधार शस्त्राने हल्ला चढविला. यामध्ये त्याच्या छातीवर, पोटावर, डोक्याच्या पाठीमागे गंभीर इजा झाली. त्याच अवस्थे तो पळत पळत सुटला. वसाहतीतील एका कारखान्याबाहेर तो कोसळला. याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने गंभीर जखमी नदाफला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यांनी मात्र उपचारापूर्वीच नदाफला मृत घोषित केले. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर करीत आहेत.