
कुपवाड, ता.९ : बुधवारी ९ एप्रिल रोजी प.पु. १०८ श्री सुधर्मसागर मुनीमहाराज प्रतिष्ठान आणि वीर सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर यांच्या २६२४ व्या जन्मकल्याणक निमित्त कुपवाड येथे वीराचार्य पुरस्कार प्रदान सोहळा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कुपवाड शहरातील समस्त जैन समाज बांधवांतर्फे बुधवार व गुरुवारी दोन दिवस भगवान महावीर यांची जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी केली जाणार आहे. महावीर जयंतीनिमित्त बुधवारी जागतिक नमोकार महामंत्र दिवस असल्याने लाल जैन मंदिरासमोर सकाळी आठ ते नऊ या वेळेत नमोकार मंत्राचा जप होणार आहे.
गुरुवारी भगवान महावीर यांची पालखी मिरवणूक व भव्य शोभायात्रा निघणार आहे. बुधवारी वितरण होणाऱ्या वीराचार्य पुरस्कारासाठी शहरातील तिघांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मीबाई रायगोंडा पाटील यांना विराचार्य उत्तम श्राविका, अभयकुमार राजगोंडा पाटील यांना युवा उद्योजक तर संतोष भालचंद्र कर्नाळे यांना उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा बुधवारी सायंकाळी सात वाजता १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन लाल मंदिर, कुपवाड येथे होणार आहे. यावेळी प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान होणार आहे.