कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड : राज्यातील नवीन उद्योजक विद्युत शुल्क माफीपासून यापूर्वी वंचित होते. त्यामुळे उद्योजकांना आर्थिक फटका बसत होता. ऊर्जा मंत्रालयाने याचा विचार करून नवीन उद्योगांना विद्युत शुल्कात माफी द्यावी, अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरने राज्याच्या उर्जा मंत्रालयाच्या सचिवांकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन आता नव्या उद्योजकांना वीज बिलामध्ये ७.५० टक्के विद्युत शुल्क माफी मिळणार असून याचा १५ वर्षापर्यंत नव्या उद्योजकांना लाभ मिळणार आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार नव्या उद्योजकांना उद्योग धंद्यांना प्रोत्साहन मिळावे, या धोरणानुसार सन २०१९ पासून विद्युत शुल्क माफी मिळणार आहे, अशी माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी दिली.
कृष्णा व्हॅली चेंबरने उर्जा मंत्रालयाच्या ठराव क्र. पी.एस.आय २०१९/सी.आर.-४६ आय.एन.डी-बी दि.१६ सप्टें. २०१९ च्या अनुषंगाने नव उद्योजकांना विद्युत शुल्क माफी मिळावी अशी २३ मे २०२४ रोजीच्या पत्रान्वये राज्याच्या उर्जा मंत्रालयाच्या सचिवांकडे मागणी केली होती.
या मागणीची तात्काळ दखल घेऊन उर्जा विभागाने याबाबतचे आदेश पारित केले आहेत. यावेळी उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरंडोले, संचालक रमेश आरवाडे, दिपक मर्दा, हरिभाऊ गुरव उपस्थित होते.