
कुपवाड , ता.४ : येथील प्रकाशनगरमध्ये एका ३८ वर्षीय युवकाचा दगड व लोखंडी पाईप डोक्यात घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. नात्यातल्या मुलीची छेडछाड काढल्याने हा खून करण्यात आला असून खून करणारे दोघे संशयित मयतचे नातलगच आहेत. सदर घटना मंगळवार (ता.४) दुपारी घडली असून खून झालेल्या युवकाचे नाव राहूल अप्पासाहेब सूर्यवंशी (वय ३८ रा. तिसरी गल्ली प्रकाशनगर, कुपवाड, मुळगाव : येडूर, कर्नाटक) असे आहे. या घटनेची कुपवाड पोलीसांत नोंद झाली आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या युवकाचे नावे सौरभ संदीप सावंत (वय २२) आणि संदीप रावसाहेब सावंत (वय ५२ दोघे रा. प्रकाशनगर, तिसरी गल्ली, कुपवाड) असे आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत हवालदार फिर्याद संदीप पाटील यांनी दिली. यात कौटुंबिक वादाचे कारणही समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मयत व संशयित हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते शेजारी राहत. सौरभ कुटुंबियांसोबत तर राहुल बाजूच्या खोलतीत एकटा राहत. राहुल व संशयित यांच्यात कौटुंबिक वाद होता. मंगळवारी दुपारी एकचा सुमारास छेडछाडीच्या कारणातून मयत राहुल व दोघां संशयितामध्ये वाद निर्माण झाला. संशयित सौरभ व त्याचा पिता संदीप दोघांनी संगनमत करून मंगळवारी (ता.४) दुपारी एकच्या सुमारास राहूलवर दगड आणि लोखंडी पाईपने हल्ला चढविला. हल्ल्यात डोक्याला गंभीर मार लागून राहुल जखमी झाला. घराबाहेर अंगणातच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयुष टीमच्या मदतीने जखमीस उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात धाडण्यात आले. पण वैद्यांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधिक्षक रितू खोकर, उपअधीक्षक व्हीमला एम, सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघां संशयित बाप-लेकाला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर अधिक तपास करीत आहेत.