सांगली : प्रतिनिधी

सांगली , ता.१५ : जिल्हातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांसाठी अर्थसंकल्प २०२५ मधून मंजुरी मिळणेबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भेट घेतली. सांगली जिल्हा हा कृषी व औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असून येथे ऊस, द्राक्षे, भाजीपाला यासारख्या शेती उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. तसेच, जिल्ह्याचा व्यापार आणि दळणवळणाचा विस्तार अधिक बळकट करण्यासाठी नवे, दर्जेदार आणि सुरक्षित रस्ते विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांची सुधारणा होणेसह त्यांच्या देखभालीस प्राधान्य दिले पाहिजे.
जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या गरजा, सध्या अस्तित्वात असलेल्या समस्या आणि भविष्यातील नियोजन यावर त्यांच्याशी चर्चा झाली. सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही बांधकाम मंत्री यांनी यावेळी दिली.