कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड शुक्रवार ता.6 : कुपवाडमधील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुरुवार (ता.5) रोजी रात्रीच्या एक ते दोन च्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला. शाखा व्यवस्थापकांच्या केबिनची काच फोडून आत शिरलेला चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्या पुराव्याचा आधार घेऊन पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. दाऊद बंदेनवाज सय्यद (वय २४ वर्ष, रा. स्मशानभूमीमागे, कुपवाड) असे त्याचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून चोरीच्या प्रयत्नाबाबत त्याविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात त्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. सुदैवाने बँकेतून रोख रक्कम किंवा इतर कोणतेही साहित्य चोरीला गेले नाही.
पोलिसांच्या अधिक माहिती अशी की, मुख्य शहरातील इमारतीत दुसऱ्या मजल्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. गुरुवारी (ता.5) रोजी सायंकाळी ५ नंतर बँक बंद झाली होती. त्याचदिवशी मध्यरात्री एकच्या सुमारास अज्ञाताने शेजारील एका इमारतीचा वापर करत शाखा व्यवस्थापकांच्या केबिनची काच ‘मारतूल’ च्या सहाय्याने फोडून आत प्रवेश केला. त्याने सर्व विभागातील काउंटरचे ड्रॉवरची चाचपणी केली. त्याच्या हाताला काही लागले नाही. यावेळी बँकेच्या आत प्रवेश केल्यानंतर सायरन वाजू लागले ते बंद होत नसल्याने त्याने मारतूल तिथेच सोडून पलायन केले. त्याबाबत फिर्याद शाखा व्यवस्थापकांनी कुपवाड पोलिसांत तक्रार नोंदवली. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी पुरावे गोळा केले. शाखेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीच्या कैद झाली होती. कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने तात्काळ छडा लावला.