कुपवाड : प्रतिनिधी


कुपवाड शहरामधून एम.आय.डी.सी. कडे येणाऱ्या रस्ता संत रोहिदास कमान चौक ते जकात नाका पर्यंतचा प्रवास करीत असताना वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. या होणाऱ्या त्रासाबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व सांगली, मिरज, कुपवाड मनपा आयुक्त यांना दिल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू व संचालक रमेश आरवाडे यांनी दिली.
या निवेदनात असे म्हंटले आहे की, कुपवाड औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहने, उद्योजक व कामगार वर्ग हे कुपवाड मार्गे सांगलीला जाण्यासाठी प्रवास करीत असतात. पंरतु कुपवाड जकात नाका ते संत रोहीदास कमान चौक पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या खराब झालेल्या रस्तामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तसेच खराब रस्त्यांमुळे सर्वांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
पूर्वीची वाहतूक व्यवस्था १० ते १२ टन वजनांची होती. आत्ताची वाहतूक व्यवस्था ही २० टन ते ६० टनाची झालेली आहे. एवढ्या अवजड वाहनांची ये-जा चालू असलेने रस्त्यांच्या दुरावस्थेत वाढ झालेली आहे. सदर खराब रस्त्याबाबत आम्ही वेळी वेळी उद्योजकांच्या जिल्हा उद्योग मित्र मिटिंगमध्ये विषय मांडला आहे. प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.
तरी सदर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनी तातडीने सदर कामाबाबत लक्ष घालून लवकरात लवकर उद्योजक व कामगारांना खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे. असे निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.