कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड : अहिल्यानगर येथे डंपारच्या धडकेत दोन वर्षीय चिमुकला जागीच ठार. ही घटना आज (ता.२१) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. या धडकेत मयत झालेल्या बालकाचे नाव मनोज ओंकार ऐवळे, वय २ वर्ष रा. शंकर सायकल दुकानासमोर, अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड असे आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत अशोक लालू ऐवळे (वय ५० वर्ष, व्यवसाय हमाली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी मयत मनोजचे आजोबा आहेत. अपघात झाल्यानंतर काही तासातच डंपर चालक मोहन तायाप्पा गुजले याला कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

घटनास्थळ व पोलिसांची अधिक माहिती अशी की, शंकर सायकल दुकान, अहिल्यानगर झोपडपट्टी, कुपवाड येथे भरगाव वेगाने येणाऱ्या MH10TD 4447 डंपरने दोन वर्षीय बालकाला जोराची धडक दिली. या धडकेत मनोज खाली पडला व डंपरचे डाव्या बाजूचे चाक अंगावर गेल्याने बालक जागीच ठार झाला. डंपर चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर जमलेल्या संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करून डंपरची तोडफोड व काचा फोडल्या तर डंपर चालक मोहन तायाप्पा गुजले यावर कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल करून अपघातानंतर अवघ्या काही तासातच कुपवाड पोलिसांनी डंपर चालकास ताब्यात घेतले. या घटनेने ऐवळे परिवारात शोकाकुळ पसरला आहे. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.
