मिरज | प्रतिनिधी
शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रूपाली पोपट माने यांची बिनविरोध निवड…..!

शिंदेवाडी, ता. ४ : मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंचपदी सौ. रूपाली पोपट माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच रेखाताई सुतार यांच्या हस्ते रूपाली माने यांचा सत्कार करण्यात आला. मावळते उपसरपंच सौ.सविता पाटील यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर रूपाली माने यांची निवड झाली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
उपसरपंच पदाची निवड सरपंच रेखाताई सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.यावेळी उपसरपंच पदासाठी रूपाली माने यांचा एकमेव एकच अर्ज आल्यामुळे त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक जयश्री नागरगोजे यांनी कामकाज पाहिले.यावेळी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल भावना व्यक्त करतांना नवनिर्वाचित उपसरपंच रूपाली माने म्हणाल्या की, उपसरपंचपदाच्या रुपाने मिळालेल्या संधीचे सोने करणार, ग्रामस्थांना अधिकाधिक सुविधा देण्यात येतील व शासनाच्या योजना तळागाळात पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे होईल. ग्रामस्थांचे स्थानिक प्रश्न समजावून घेऊन विकासासाठी कटीबद्ध आहे. गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊ तसेच सरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन जनतेचे प्रश्न सोडवून शिंदेवाडीच्या विकासाची परंपरा कायम ठेवू.
यावेळी सरपंच रेखाताई सुतार, पोलीस पाटील शैलजा सुतार, प्रहार जिल्हाध्यक्ष सुनील सुतार, युवा जिल्हाध्यक्ष ओम भोसले, सर्जेराव शिंदे, आकाश शिंदे, राजू कदम, माजी उपसरपंच संदीप पाटील, लक्ष्मण साळुंखे, उत्तम पाटील, अविनाश रणदिवे, बापू शिंदे, महादेव लवटे, सुरेश रणदिवे, सुधीर रणदिवे, दिनेश दिवटे, शिवाजी कवाळे, किशोर साळुंखे, संभाजी पाटील, रवींद्र सुतार, निवृत्ती साळुंखे यासह आदींची उपस्थित होती.