
कुपवाड ता.१५ : माधवनगर येथील मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी अनोखळी संशयिताविरुद्ध कुपवाड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत मंदिराचे पुजारी अनिल मानधन्या यांनी कुपवाड पोलिसांत फिर्याद दिली. सदर घटना माधवनगर अष्टविनायकनगर येथील गट नबंर १९ मधील जमीनीवर खासगी जागेत असणारे ४ बाय ६ आकाराचे छोटे मंदिराच्या ठिकाणी घडली आहे.
घटनास्थळ व पोलिसांची अधिक माहिती अशी की, मंदिराचे पुजारी अनिल मानधन्या हे शनिवार सकाळी हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी आले होते. त्यावेळी अज्ञाताने मंदिरातील हनुमान मूर्तीची विटंबना केल्याचे निदर्शनाला आले. पुजारी यांनी ही माहिती जमीनीचे मालकाला सांगितली. मालकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस अनोखळी संशयितांचा शोध घेत आहेत.